लोक न्यूज
अमळनेर : धुळे रोड व पिंपळे रोड दरम्यान असलेल्या कॉलनी एरियात गेल्या अकरा दिवसांपासून पिण्याचा पाणी पुरवठा झालेला नाही. शहरात  कामांमुळे सतत पाईप लाईन तुटत असल्याने  नागरिकांना गेल्या वर्षभरापासून पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
       बहादरपूर रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ एअर व्हॉल्व्ह पाईप तुटल्याने पाणी पुरवठा उशिराने होणार होता. त्याच परिसरात भुयारी गटारींचे काम सुरू असल्याने खोदकाम करताना मुख्य पायीपलायीन फुटल्याने पाणी पुरवठा आणखी दोन दिवस होणार नसल्याचे सांगण्यात आले. पिंपळे रस्त्यावर एलआयसी कॉलनी , विठ्ठल नगर ,  संत सखाराम महाराज नगर , उत्कर्ष नगर , टेलिफोन कॉलनी व इतर परिसरात गेल्या वर्षभरापासून अनेकदा अडचणी निर्माण झाल्याने सातत्याने पाणी पुरवठा खंडित झाला आहे.
      उन्हाळ्यात जळोद येथील यंत्रणा बिघाड , वादळामुळे पोल तुटणे , पाईप लाईन तुटणे , भुयारी गटार खोदकामामुळे पाईप तुटणे , टेकडीवर बिघाड होणे , रस्त्यात पाईप तुटणे , वीज पुरवठा खंडित होणे , रस्त्याच्या खोदकामामुळे नळ जोडणी तुटणे  ,असे प्रकार वारंवार होत गेल्याने अनेकदा पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवले. नागरिकांचे मात्र पाण्यासाठी हाल होत आहेत.
        तांत्रिक बिघाड झाल्यास पालिकेने पूर्वसूचना देणे क्रमप्राप्त होते मात्र तसे होत नाही. सूचना न मिळाल्याने नागरिक वेड्यासारखी नळांना पाणी येईल म्हणून वाट पाहतात. अचानक कळल्यावर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.