लोक न्यूज
अमळनेर : साहेब इदगाह मैदानाच्या बाजूला खड्ड्यात पांढऱ्या कपड्यात काहीतरी गुंडाळून दफन करण्यात आले आहे असा फोन आला अन पोलिसांचा ताफा इदगाह मैदानावर पोहचला ...खोदकाम सुरू झाले अन अपेक्षा भंग झाला...खोदा खड्डा अन निकला कुत्ता !
          गांधलीपुरा भागात इदगाह मैदानाच्या शेजारी कोणीतरी पांढऱ्या कपड्यात कोणाला तरी गुंडाळून खड्डयात पुरत असल्याचे एकाने पाहिले अन त्याने पोलीस निरीक्षक विकास देवरे याना सांगितले. लहान मुलगा किंवा प्राणी पुरला असावा असा संशय व्यक्त करण्यात आल्याने पोनि विकास देवरे , पोलिस उपनिरीक्षक युवराज बागुल , पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , सिद्धांत शिसोदे , जितेंद्र निकुंभे , राजेंद्र देशमाने , उज्वल म्हस्के , प्रशांत पाटील, विनोद संदानशीव  यांचा ताफा घटनास्थळी पोहचला.
     जवळच असलेल्या इदगाह  मैदानातून कुदळ पावडी आणण्यात आली. सर्वांसमक्ष बुजलेला खड्डा पुन्हा उकरण्यात आला. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असताना अपेक्षाभंग झाला. पांढऱ्या शुभ्र कपड्यात एक पाळीव कुत्रा पुरण्यात आला होता. त्याची पूजा करून फुले टाकून विधिवत त्याला पुरण्यात आले होते. नोंद घेऊन पोलिसांनी त्याला पुन्हा पुरले.