लोक न्यूज
अमळनेर: मागील वर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्ण वाया गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ३८ लाखांच्या मदतीला शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत जिल्हा किसान काँग्रेसकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता त्याची ही निष्पत्ती असल्याचे किसान काँग्रेसचे प्रा सुभाष पाटील यांनी सांगितले.
       गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता. विशेषत: कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला होता. परतीच्या पावसामुळे कापूस काढणीवर असतानाही शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला होता. तालुक्यातील ५३०६४ शेतकऱ्यांची ३२५६९.७८ हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली होती. आता या शेतकऱ्यांना एकूण ४४ कोटी ३८ लाख ५९ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे.

किसान काँग्रेसने केला वेळोवेळी पाठपुरावा...

    ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून जिल्हा किसान काँग्रेसकडून २९ ऑगस्ट व २८ सप्टेंबर २०२४ रोजी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन प्रशासनाला देण्यात आले होते. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पुन्हा दिलेल्या निवेदनामुळे प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले. त्यामुळे किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना ४४.३५ कोटींची मदत मिळाल्याची माहिती प्रा. सुभाष पाटील यांनी दिली आहे.