देशासाठी बलिदान देणाऱ्या पारोळा येथील शहीद जवान जितेंद्र देविदास चौधरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन खासदार स्मिताताई वाघ यांनी त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी व त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष निर्णय घेतला.
खासदार स्मिताताई वाघ यांनी शहीद जवानाच्या पत्नी व आई-वडिलांना धीर देत "देशासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाच्या पाठीशी समाज उभा राहिला पाहिजे," असे म्हणत, त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती बोहरा हायस्कूलचे चेअरमन सुरेंद्र भाऊ बोहरा यांना केली.
या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत सुरेंद्र भाऊ बोहरा यांनी जवानाच्या कन्येचे आठवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण बोहरा सेंट्रल स्कूलतर्फे मोफत देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण त्या अश्रूंमध्ये समाजाकडून मिळालेल्या आधाराचा भावही स्पष्ट दिसत होता.या वेळी सुरेंद्र बोहरा,गोपाळ दाणेज, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, शिवसेनेचे शहराध्यक्ष अमृत चौधरी,अतुल पवार,सचिन गुजराथी,अतुल दादा पवार धीरज महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार स्मिताताई वाघ यांची संवेदनशीलता आणि समाजासाठीची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शहीद जवानाच्या बलिदानाची आठवण सदैव राहील, आणि त्यांच्या कुटुंबासाठी उभ्या राहिलेल्या या मदतीमुळे समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
लोक न्यूज