लोक न्यूज
अमळनेर: ज्या ग्रामपंचायतीत बाप शिपाई म्हणून कार्यरत आहे त्याच ग्रामपंचायतीत त्या बापाची कुमारिका कन्या सरपंच होऊन  गावाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारल्याचा आनन्ददायी अनुभव डांगरी वासीयांना आला. विशेष म्हणजे तिचा भाऊ देखील विका सोसायटीचा चेअरमन म्हणून गावाच्या शेतकऱ्यांची सेवा करीत आहे.
तालुक्यातील डांगरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कु. दिपाली उदय शिसोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तिचा भाऊ विकासो चेअरमन पदाची धुरा सांभाळत असून गावचा कारभार  उच्चशिक्षित बहीण भावाच्या हातात आल्याने अनेकांनी आनन्द व्यक्त केला आहे.
        नवनियुक्त सरपंच दिपाली (वय २६ वर्ष) हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण घेतले आहे व तिचा २४ वर्षीय भाऊ चि. स्वप्नील उदय शिसोदे हा देखील विकास सोसायटी प्र. डांगरी येथे चेअरमन आहे. तो देखील फार्मसीचे शिक्षण घेत आहे. दोघे उच्चशिक्षित भाऊ बहिण गावाचा मुख्य धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील उदय प्रल्हाद शिसोदे हे ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्याच ठिकाणी मुलीला सरपंच पदाचा बहुमान मिळाल्याने वडिलांचा व कुटुंबीयांचा आनंदाने ऊर भरून आला होता. या निवडीप्रसंगी मंडळ अधिकारी पी. पी. शिंदे, तलाठी श्रीमती बडगुजर, ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य योगेश नारायण शिसोदे, कैलास सोनू कोळी, अनिल शिसोदे, मीना रामचंद्र पाटील, ललिता महेंद्र शिसोदे, जकियाबी पठाण आदी उपस्थित होते. त्यानंतर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून नवनिर्वाचित सरपंच दीपाली हिचा सत्कार करण्यात आला.